Design non-stop Stories.001

अश्मयुगातील खल-बत्ता ~ Stone Age Stone Mortar and Pestle

अश्मयुगातील खल-बत्ता ~ Stone Age Stone Mortar and Pestle, story by Design nonstop
Design non-stop Stories.001

मनुष्यजाती ही संपूर्ण जीवसृष्टीतली सर्वात उत्क्रांत आणि विकसित प्रजाती आहे असं आपण मानतो. मनुष्यात आणि इतर प्राण्यांत एवढा फरक कसा झाला असेल? मनुष्य हा खूपच जटील प्राणी आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माणसाकडे जगण्याची अंतःप्रेरणा तर आहेच पण त्यावर त्याला नियंत्रण मिळवता आलंय. यला कारणीभूत आहे माणसाचा अतिशय प्रगत मेंदू. विचाराला स्मरणशक्तीची जोड मिळाली आणि त्यातही त्याच्या जवळ असलेलं विलक्षण कुतूहल; यातून मनुष्याला तर्क करायला जमला आणि तो भविष्याबद्दल कल्पनादेखील करू लागला.

मागच्या रविवारी आपण मनुष्यानी दगडापासून निर्माण केलेली पहिली शस्त्र पाहिली. माणूस व्हायच्या आधी वानरांनीही दगडाचा वापर शस्त्र म्हणून केल्याचे शोध लागले आहेत. पण त्यात एक मोठा फरक आहे. माणसाला आज प्रमाणे उद्या सुद्धा ही भूक लागेल हे लक्षात आलं होतं; तेव्हा पुन्हा नवीन दगडाला आकार न देता, आहे त्याच दगडाला त्यांनी उत्कृष्ट धार काढली. त्यातूनच पुढे छोट्या दगडी कुऱ्हाडी, अणकुचीदार भले या सारखीही शस्त्र निर्माण केली. शिकार करण्यात माणूस एव्हाना तरबेज झाला. जंगलातून भटकत माणूस आपला उदरनिर्वाह करत होता. पण अचानक काहीतरी घडलं आणि सगळ्या सृष्टीची जणू कायापालट झाली. सुमारे १२००० वर्षांपूर्वी निसर्गात, हवामानात अचानक हिंस्त्र बदल घडू लागले. पृथ्वीवरचं तापमान वाढून समुद्र पातळी उंचावू लागली. हिमनग वितळून पाणी झाले आणि बर्फाच्या जागी गवत दिसू लागलं.
पाचवं हिमयुग संपलं. मनुष्य प्रजाती पृथ्वीच्या सर्व भूखंडांवर विखुरलेली होती. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या तश्याच झाडांच्याही बर्याच प्रजाती नष्ट झाल्या होत्या. मनुष्याच्या उत्तर्जीवितेसाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा होत्या. निवाऱ्याला नैसर्गिक गुहा सापडत, तर हवामानापासून बचाव करण्यासाठी प्राण्याची कातडी किंवा झाडा-पानांचा आधार घेता येत होता. अन्नाची गरज मात्र रोज नव्यानं भिडत होती. आपल्याला शिकार करणं फार सोपं राहिलेलं नाही हे माणसांनी एव्हाना हेरलं होतं. एखादं जनावर मिळालं तरी इतर मांसाहारी प्राणी त्यावर तुटून पडत. झाडावरची फळं खायला माकडं किंवा पक्षीच आधी पोहोचत. इथेच माणसाच्या प्रगतीला मोठी कलाटणी मिळाली. माणसाला प्राण्यांपासून, पक्ष्यांपासून असलेली स्पर्धा मोडून काढण्याशिवाय काय पर्याय होता? जे धान्य, कंद, मूळं, बिया इतर प्राणी किंवा पक्षी खाऊ शकत नाहीत, त्यांचा आधार माणसानी आपली भूक शमवण्यासाठी घेतला. माणूस आता शेतीचे प्रयोग करू लागला. पण हे धान्य, बिया तशाच कशा पचवणार? इथे लक्षात घ्यायला हवं की १२,००० वर्षांपुर्वी माणसाला फक्त दगडच वापरता येत होता. त्यानी दगडाची खळगी हेरली आणि त्यात बिया भरून दुसऱ्या दगडानी कुटायला सुरुवात केली. इथे जन्म झाला तो खल आणि बत्ता यांचा.

आता हा खल-बत्ता बनवण्यासाठी कोणता दगड वापरायचा? दगडाची योग्यता कशी तपासायची? त्याचा आकार कसा असावा? माप काय असावं? हा सगळा विचार काही एकाच व्यक्तीनी केला नाही, किंबहुना हे सगळं एकाच वेळेलाही घडलं नाही. बर्याच पिढ्या गेल्या – माणसाच्या वाढत्या गरजा आणि अनुभव यातून तो या खल-बत्त्याच्या ‘डिझाईन’ मध्ये बदल करत गेला. जे धन्य कुटायचं त्यापेक्षा डागड टणक हवाच, तो ठिसूळ असेल तर अन्नात त्याचाच भुगा मिसळेल हे लक्षात अलं. त्यात अन्न शोषलं जाऊ नये, दगडाचा परिणाम त्यातल्या अन्नावर होवू नये हेही माणसांनी कालांतरानी हेरलं. अन्नकण चिकटू नये म्हणून खल आणि बत्त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत करायला हवा. या सगळ्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाची सुरुवात झाली आणि अन्नाची भ्रांत मिटली. साहजिकच, हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. शिकाऱ्याचा शेतकरी झाला, आणि जंगलातला भटका माणूस नदीकाठी स्थिरावू लागला. एव्हाना तो आपल्या गरजे साठी प्राणी पळूही लागला होता.

अन्नाची भ्रांत मिटल्याशिवाय कलांचा उगम होत नाही. शेती, खल-बत्ता, अग्नी, स्वयंपाक अशी तंत्र विकसित करताना माणूस जसा स्थिरावला, तसा तो समाजही बंधू लागला. शेती साठी आवश्यक वाटली म्हणून निसर्गाची पूजा करू लागला – सण साजरे करू लागला. आता त्यासाठी विशेष उपकरणे ही लागणारच. इथेच पहा ना – पॅप्युआ गिनी मधला हा बत्ता किती सुंदर घडवला आहे. हा बत्ता जवळपास एक फुट उंचीचा आहे. त्याची कुटण्याची बाजू क्रिकेटच्या चेंडू एवढी असावी. त्यावर असलेला सुबक दांडा, उघडत जाणारे पक्ष्याचे पंख आणि नाजूकपणे निमुळती होत जाणारी त्याची मान – या सगळ्यात काय विलक्षण मिलाफ साधला गेला आहे.

आता या सगळ्या नक्षीचा खरं तर अन्न शिजवण्याशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. पण कुठलीही क्रिया करताना त्यामागची भावना ही कार्यसिद्धीसाठी प्रेरणा ठरते. त्यात क्षुधा आणि भावना यांचं तर फारच जवळचं नातं आहे. एकत्र जेवल्यानी माणसं जवळ येतात किंवा माणसाच्या हृदयाची वाट ही त्याच्या पोटातून जाते, असं आपण आजही मानतो. आत्ताही आठवून पहा, आजीचा पोळपाट, कल्हई करून चमकवलेल्या कढया, आपलं नाव कोरून घेतलेली भांडी, या सगळ्यांत आपल्या कितीतरी आठवणी दडलेल्या आहेत. अश्या आठवणींची साठवण करण्याची सुरुवात १०००० वर्षांपूर्वी, खल-बत्ता निर्माण केला तेव्हाच केली होती. अश्मयुगातला हा खल-बत्ता आपण आजही जसाच्या तसा वापरतो.

The story originally appeared in Lokmat, HERE.

Share your comments

Recent

Everyday Religiosity and Housing in Suburban Mumbai

Everyday Religiosity and Housing in Suburban Mumbai | Academic Research by Krisha Kothari

Krisha Kothari, in her academic research through an ethnographic investigation, interrogates the dialectical tensions between apartment typologies and quotidian religious practices in Mumbai’s suburban Daulat Nagar. The narrative methodology reveals how Jain religiosity intersects with real estate regulations, producing spatial frictions that exceed normative housing configurations, ultimately articulating architectural provocations for absorbing religious difference.

Read More »