डिझाईनच्या दुनियेत: The World of Design

The World of Design: डिझाईन म्हणजे काय ? हा प्रश्न समोर आला म्हणजे आपल्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण होतात. कपड्यांवरचे डिझाईन, रांगोळीचे डिझाईन, बाटलीचे डिझाईन, घराचे डिझाईन, मोबाईलचे डिझाईन अशा एक ना अनेक मानवनिर्मित गोष्टींचे उल्लेख करताना आपण डिझाईन हा शब्द सहज वापरतो.

माणसाचे एकवेळ माणसावाचून चालेल, पण वस्तूंवाचून मात्र अडेल. हे वाक्य काहीसे अतिरेकी उध्दट वाटेल, पण ते सत्य आहे. आत्ता तुम्ही जिथे कुठे बसून हे वाचत असाल, त्याच्या आजूबाजूला सहज एक नजर टाका. माणसे असतील किंवा नसतीलही, पण  ‘वस्तू’ असतीलच. हातातले वर्तमानपत्र, मोबाईल फोन, डोळ्यावरला चष्मा, बुडाखालची खुर्ची किंवा सोफा, समोरचे दार, शेजारचा चहाचा कप, दारातल्या चपला, अंगातला टीशर्ट…मोजू तितक्या कमीच!
या वस्तूंशिवाय आपण कसे जगू? माणसांनी वस्तू घडवल्या की वस्तूंनी माणसाला? या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली असावी? म्हणजे  मोबाईल फोन ‘जसा’ आहे, तो ‘तसा’ कसा घडला असेल? खुर्ची किंवा सोफा आज जसे आहेत तसे घडेतो कोणकोणत्या टप्प्यातून गेले असतील? हे सगळे कोणी, कसे, कोणत्या मार्गाने आणि दृष्टीने घडवले असेल? आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचा आकार जसा दिसतो, तसा तो घडत येण्यामागे आणि बदलत राहाण्यामागे कोणता विचार आणि शास्त्र असते? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची वाट एका संकल्पनेकडे जाते : डिझाईन!

डिझाईन म्हणजे काय ? हा प्रश्न समोर आला म्हणजे आपल्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण होतात. कपड्यांवरचे डिझाईन, रांगोळीचे डिझाईन, बाटलीचे डिझाईन, घराचे डिझाईन, मोबाईलचे डिझाईन अशा एक ना अनेक मानवनिर्मित गोष्टींचे उल्लेख करताना आपण डिझाईन हा शब्द सहज वापरतो. बरं या शब्दामागचे व्याकरण शोधायला गेलात तर आणखी वेगळी गंमत सापडते. ‘डिझाईन आजच्या जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे’ , यात डिझाईन हा शब्द नाम म्हणून वापरला आहे. ‘या टी-शर्ट मध्ये तुमच्याकडे अजून काही डिझाईन्स आहेत का?’ , यात डिझाईन सर्वनाम म्हणून वापरला आहे. ‘घराचे डिझाईन बनवण्यासाठी आम्ही आर्किटेक्टला भेटणार आहोत’, यात डिझाईन क्रियापद म्हणून वापरला आहे. मी म्हणत होतो ती गंमत तुमच्या लक्षात आली असेलच. डिझाईन हा शब्द कोण, कोणासाठी आणि कुठल्या अनुषंगाने वापरतो आहे त्यावर ‘डिझाईन’ या शब्दा मागचा व्यवहारातला अर्थ आणि हेतू ठरतो. जॉन हॅसकेट नावाचा एक जाणकार म्हणतो की ‘डिझाईन’ हा शब्द इंग्रजीतील ‘Love’ या शब्दाप्रमाणे आहे. ‘Love’ या शब्दाचा उपयोग कोण, कोणासाठी आणि कुठल्या संदर्भात करतो त्याप्रमाणे या शब्दाचा अर्थ बदलतो. उदाहरणादाखल त्यांनी बनवलेले एक रंजक वाक्य येथे नमूद करतो “Design is to design a design to produce a design”. या शब्दाचा उगम इसवी सन १३५० ते १४०० काळात लॅटिन भाषेत आढळतो आणि ऑक्सफर्ड शब्दकोशाप्रमाणे याचा अर्थ एखादी गोष्ट कशी असावी किंवा दिसावी हे ठरवण्यासाठी असणारी पद्धत किंवा कला असा होतो. इथे एक गोष्ट नक्की नमूद केली पाहिजे की कलेचा उगम आणि मानवी अस्तित्वात असणारा कलेचा आवाका हा मानवी संस्कृतीत डिझाईन पेक्षा हजारो वर्ष जुना आहे. मग या सगळ्या विचारांच्या कोलाहलात डिझाईन ची व्याख्या मांडायची झाली तर एक प्रयत्न असा असू शकतो तो म्हणजे “आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या जगण्याला अर्थ देण्यासाठी मानव निर्मित पर्यावरणाला घडवण्याची आणि आकार देण्याची मानवी क्षमता म्हणजे डिझाईन”. ह्या मानवी क्षमतेचे प्रमाण आणि आवाका आजमवायचा असेल तर हा लेख तुम्ही जिथे बसून वाचत आहात तिथे आजूबाजूला जरा नजर फिरवून बघा. मग ते घर असेल, ऑफिस असेल, ग्रंथालय असेल किंवा रेल्वेचा डब्बा असेनात; एक मात्र नक्की की त्या पर्यावरणातली प्रत्येक गोष्ट ही मानवनिर्मित आहे, इतकंच काय तर त्या पर्यावरणात असणाऱ्या झाडाला देखील आपण आकार दिला आहे किंवा त्याची वाढ आपल्या गरजेप्रमाणे आपण नियंत्रित केली आहे.

थोडक्यात काय तर ह्या पर्यावरणाला आपल्या गरजा आणि अपेक्षांच्या कक्षांमध्ये घेऊन मूळ स्वरूपात असलेल्या खूप कमी गोष्टी आज आपण भूतलावर अस्तित्वात ठेवल्या आहेत. या लेखमालेचा उद्देश मानव निर्मितीच्या कक्षा नाकारणं नसून डिझाईन क्षेत्रात मानवाने केलेल्या प्रगतीच्या कार्याची दखल घेणे हा आहे. उपलब्ध साधन सामग्रीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती करण्याची आपली क्षमता हे या भुतलावर असणाऱ्या मानवी अस्तित्वाचे द्योतक आहे. इतर कुठल्याही प्राणिमात्रांमध्ये ही क्षमता इतक्या प्रगत थराला पोहोचलेली दिसत नाही. केवळ ह्या क्षमतेमुळे आपण आपला अधिवास आणि सभ्यता एका विशिष्ट प्रकारे घडवू शकलो आहोत. ‘ डिझाईनला’ भाषे इतकंच महत्व आहे कारण माणूस हा ‘माणूस’ असल्याच्या सत्याला बळकटी देणारं हे द्योतक आहे. मानव निर्मितीची ही क्षमता अनेक मार्गांनी आपण अस्तित्वात आणत असतो. जसे की स्थापत्यकला, बांधकाम, अभियांत्रिकी, प्रॉडक्ट डिझाईन, फॅशन डिझाईन इत्यादी. थोडक्यात आपल्या जगण्याला द्विमितीय आणि त्रिमितीय आयाम देणे हा यामागचा उद्देश. दैनंदिन जीवनातील वस्तू, संवाद आणि पर्यावरण मग ते घराशी निगडित असो, कामाच्या जागेशी निगडित असो, रस्त्याशी, सार्वजनिक ठिकाणाशी किंवा आपल्या प्रवासाशी का निगडित असेनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या आपण या जगण्याला आणि जगाला आकार देत असतो.

मानव निर्मितीच्या क्षमतेला ‘डिझाईनला’ जर इतके आयाम असतील तर ते जाणून घेण्यासाठी आपण सुरुवात करणार तरी कुठून? याचे उत्तर मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात दडलं आहे. काळाच्या अनुषंगाने उलगडत जाणारे उत्क्रांतीच्या इतिहासातले हे थर डिझाईनची गोष्ट सांगत जातात. ह्या गोष्टीची सुरुवात होते सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात, जेव्हा माणूस हा अन्नाच्या शोधात भटकत होता. स्वतः शिकार करणे किंवा इतर हिंस्त्र पशूंनी केलेल्या शिकारीतला वाटा खाणे हेच त्याच्या उपजीविकेचे साधन होते. भटकंती करणारा हा मनुष्य प्राणी निसर्गात आढळणाऱ्या सर्वसाधारण दगडाला घडवून प्राण्याची त्वचा आणि मांस कापण्यासाठी एक हत्यार किंवा साधन बनवू लागला.

या हत्याराकडे निरखून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याची एक बाजू मजबूत पकडीच्या दृष्टीने जाड आणि गोलाकार बनवली गेली आहे तर दुसरी बाजू बारीक आणि धारदार आहे. अनेकदा हिंस्त्र श्वापदांनी खाऊन संपले ल्या शिकारीत माणसाला केवळ राहिलेल्या हाडांचा हिस्सा मिळे. अशावेळी या हत्याराचा वापर हाडी फोडून त्यातील अत्यंत पौष्टिक अशा ‘बोन मॅरो’ नामक द्रवपदार्थ काढण्यासाठी केला जात असे. वैज्ञानिक दृष्ट्या असाही एक कयास आहे की माणसाच्या मेंदूच्या विकासात या बोन मॅरो सेवनाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आज भागणाऱ्या भुकेच्या आनंदापेक्षा उद्याच्या अन्नाची भ्रांत माणसाला कायमच सतावत असते. मनुष्य प्राणी आणि जनावरांमध्ये या हत्याराने सगळ्यात मोठा फरक घडवून आणला तो म्हणजे गरजेइतक्या मांसाचे भक्षण झाल्यावर, उरलेल्या अन्नाचे तुकडे करून माणूस ते भविष्यासाठी साठवून ठेऊ लागला. निसर्गात आढळणाऱ्या साधनसंपत्तीचा वापर करून बनवलेल्या या गोष्टींनी मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी दिली. आपल्या डिझाईनच्या जगाला इथून सुरुवात होते, चला तर मग येथून पुढे येणाऱ्या लेखन मालिकेत आपण परिचित जाणवूनही अपरिचित असणाऱ्या या डिझाईनच्या दुनियेत फेरफटका मारुयात.

Story originally published in Lokmat

Share your comments

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Recent

WE ARE HIRING /

ArchitectureLive! is hiring for various roles, starting from senior editors, content writers, research associates, graphic designer and more..