गेल्या रविवारी आपण टर्कीच्या क्रोएसस राजाची नाणी पहिली. २५०० वर्षापूर्वी, व्यापारात प्रमाणबद्धता यावी म्हणून चलन जन्माला आलं. जसजसा व्यापार वाढत गेला, तसतशी चलनाची कल्पना रुजत गेली आणि फुलतही गेली. ही नाणी घडवताना काय आणि कसा विचार केला असेल? चलन धातूचं का असावं? त्यातही सोनंच का बर? तांब, पितळ, चांदी, सोनं, लोखंड हे धातू आणि त्यांची मिश्रणं वस्तूंना आकार देण्यासाठी आपण वापरत होतो. धातू घडवण्याचं, ते एकमेकात मिसळून वस्तू साठी योग्य गुणधर्म असलेले मिश्रधातू मिळवण्याचं तंत्र आपण विकसित केलं होतं. त्यामुळे धातू वितळवून पुन्हा घडवला तरीही त्याचं वजन बदलत नाही हे लक्षात आलं होतं. तसच धातूच्या वस्तूला मार बसला तर तो पातळ होऊ शकेल, आकार बदलू शकेल पण त्याचा तुकडा पडणं अवघड आहे. तुकडा करायला मुद्दाम कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे चलन धातूपासून तयार करायचं हे नक्की ठरलं. आता मुद्दा येतो तो सोन्याचा. खाणीतून इतर धातू वेगळे काढणं तुलनेत सोपं होतं पण सोनं आणि चांदी यांची जोडी तोडणं अवघड होतं. सोनं आणि चांदी दोन्ही धातू रासायनिक पदार्थांना दाद देत नाहीत. त्यामुळे या धातूचं मिश्रण – त्याची पूड करून, मिठाबरोबर तापवून, म्हणजे त्यातली चांदी जाळून सोनं वेगळं काढलं जाऊ लागलं. एवढे कष्ट घेतल्यामुळे सोन्याला जास्त मोल मिळणं स्वाभाविक आहेच, आणि दुसरं कारण म्हणजे आधी म्हटल्या प्रमाणे सोन्यावर कोणत्याही रसायनाचा परिणाम होत नाही, त्याला गंज लागत नाही म्हणजेच त्याची शुद्धता कायम आहे. सोनं हे आजही प्रमाणबद्धतेचं, अच्युताचं प्रतिक आहे.
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4d/Kosala_Karshapana.jpg
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/7/75/Hoard_of_mostly_Mauryan_coins.jpg
Image (square stamped coins of Mauryan dynasty)
क्रोएससची ही चलनाची कल्पना जणू कामधेनुच होती. तिला वश करण्याची लालसा इतर राजांना न झाल्यासच नवल. सायरस नी लिडियावर कब्जा करून क्रोएससचं चलन ताब्यात घेतलं. पुढे या सायरसचं राज्य मध्यपुर्वेतील बॅबिलोनियापासुन सिंधूघाटी पर्यंत पसरलं. आता जरा २५०० वर्षांपूर्वीच्या सिंधुप्रदेशात डोकावून पाहूयात. त्याकाळी आपल्याकडे मौर्यांचं साम्राज्य होतं. व्यापाराचे दाखले आपल्याकडे मोहेंजो-दारो पासून आहेत. त्याकाळी आपल्याकडे चलनी नाणी नव्हती पण मोजमापाचं साधन होतं बर का. मोहेंजो-दारो चे व्यवहार कवड्या मोजून व्हायचे. जगाचा इतिहास पहिला तर सारख्याच कल्पनांचा उगम सगळीकडे साधारण एकाच वेळेला होताना दिसतो. जे लिडिया मध्ये क्रोएससला सुचलं तेच महाजनपद राजांनाही उमगलं होतं. ‘कार्षापण’ या त्यांच्या चांदीच्या चौकोनी मोहरा. मौर्यांच्या साम्राज्यात तर या राजमुद्रा म्हणून गणल्या जात. कौटिल्य अर्थशास्त्रानुसार इतर कुठल्याही मोहरा वापरणं हा गुन्हा होत असे. अर्थकारणाचं रुपांतर राजकारण आणि सत्तेत होताना आपल्याला या काळात नक्कीच दिसेल.
आता मात्र नाण्याची दुसरी बाजू उलगडायला सुरुवात होते. व्यापारात प्रमाण ठरलेल्या चलनावर सत्ताधार्यांनी आपली मोहर उमटवायला सुरुवात केली. पहिल्यांदा नाण्यावर कोणत्या व्यक्तीचं चित्र छापलं गेलं असेल तर ते अलेक्झांडरचं होतं. संपूर्ण जगावर सत्ता गाजवायची महत्वाकांक्षा असलेला हा उन्मत्त आणि आक्रमक अलेक्झांडर! यांनी स्वतः आपली मोहर चलनात आणली तर त्यात आश्चर्य काहीच नाही. पण गम्मत म्हणजे अलेक्झांडरचा चेहेरा असलेलं नाणं त्याच्या पश्चात त्याचा उत्तराधीकारी – लायसीमकस यानी चलनात आणलं. त्याचा हेतू काय असावा? अलेक्झांडरचा पराक्रम एवढा मोठा होता की त्याची बरोबरी करणं लायसीमकसला अशक्य होतं. पण त्याचं ‘गुडविल’ वापरता येणं शक्य होतं. तेंव्हा आपण अलेक्झांडर पुढे नम्र राहून त्याच्याच नावचं छत्र चालवणार आहोत हा संदेश लोकांपर्यंत त्याला पोहोचवायचा होता. आणि तो पोहोचवण्याचं सर्वात परिणामकारक साधन हे नाणंच नाही का?
आता पुन्हा एकदा आपण भारता कडे वळूयात. इथेही अलेक्झांडर सारखाच महत्वाकांक्षी, मौर्य साम्राज्यातला शेवटचा – सम्राट अशोक. त्याचं मात्र कलिंग युद्धानंतर मतपरिवर्तन झालं आणि त्यानी अध्यात्मिक मार्ग जवळ केला आणि बौद्ध धर्माचा प्रसारही सुरु केला. ह्या काळात सर्वत्र नवीन धर्मांची स्थापना होऊ लागली होती. मध्यपूर्वेत ख्रिस्तीधर्म, इस्लाम यांची सुरुवात झाली, भारतात जैन धर्माबरोबर बौद्ध धर्म प्रचारला जात होता. गुप्तांचं साम्राज्य स्थापन होई पर्यंत सिंधू संस्कृतीच्या जीवनशैलीला ‘हिंदू-धर्म’ मानलं गेलं नव्हतं. ते कार्य गुप्त सम्राटांनी सुमारे १८०० वर्षांपूर्वी केलं. गुप्त हे विष्णूचे उपासक होते. ज्या प्रकारे विष्णूनी पृथ्वीचं संरक्षण केलं आणि सुबत्ता निर्माण केली, त्याच प्रेरणेनी गुप्त राज्य करतील असं त्याचं आश्वासन होतं. जैन आणि बौद्ध धर्माच्या बरोबरीने हिंदू जीवनशैलीही दृढ व्हावी यासाठी मंदिरांची बांधकामं, स्थापना, यज्ञविधी, तसच हिंदू शास्त्र, कला, काव्य यालाही प्रोत्साहन देण्याचं काम गुप्तांनी केलं. वराहमिहिरासारखे तत्त्वज्ञ, भास आणि कालिदासा सारखे कवी-नाटककार, आर्यभट्टांसारखे गणिती-खागोलतज्ञ, सुश्रुतासारखे वैद्यचिकित्सक, आणि कामसूत्र रचणारे वात्स्यायन या काळात होऊन गेले. कला, तत्त्वज्ञान, शास्त्र, विज्ञान सगळ्यांचीच प्रगती झपाट्यानी सुरु होती. खरोखरच सिंधुप्रदेशाचा हा सुवर्णकाळ होता. या सगळ्या प्रगतीचे प्रेरक असलेल्या गुप्तांनी डिझाईन केलेली सोन्याची नाणी त्यांच्या तत्वांची, विचारांची साक्ष देतात.
इथे नाण्यावर अश्वमेध घोडा दाखवला आहे. सनातन परंपरा पाळून अश्वमेध यज्ञ करून सत्पात्री राज्यपद मिळवणारा राजाचं हे प्रतिक आहे.
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/2/21/KumaraguptaFightingLion.jpg
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c5/ChandraguptaIIOnHorse.jpg
१ल्या नाण्यावर अश्वारूढ असलेला दुसरा चंद्रगुप्त दिसतो आहे आणि २र्या नाण्यावर सिंहाला जेरबंद करणारा कुमारगुप्त.
चलन म्हणून अस्तित्वात आलेली नाणी १८०० वर्षांपासून कितीतरी संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपण प्रिंटींग प्रेस ही आजच्या मास-कम्यूनिकेशन ची जननी मानतो. पण त्याच्या कितीतरी आधी नाण्यांचा उपयोग प्रसार मध्यम म्हणून झालेला दिसतो. हा वापर आजही तसाच टिकून आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. एखाद्या देशाच्या/संस्कृतीच्या इतिहासाचा आढावा फक्त नाणी पाहून देखील घेता येऊ शकेल. नाशिकला आजही नाणे संग्रहालय पाहायला गेलात तर याची प्रचीती तुम्हाला नक्की येईल.