डिझाईनचा शोध घेत आपण मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाला निघालो आहोत. या लेखमालिकेच्या अनुषंगाने आपल्याला उत्क्रांतीच्या वाटेवर भेटणारा हा माणूस आता स्थिरावला आहे. भटकंती करत फिरणारा हा माणूस इ.स १०,००० वर्षांपूर्वीच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि नित्यनियमाने शेती करू लागला आहे. शेत जमिनीस बांधल्या गेलेल्या या माणसाची दिनचर्या आता धान्य पेरणे, उगवणे, त्याची साठवण करणे आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची भुकेची गरज भागवणे ह्या गोष्टींशी बांधली गेलेली आहे. अखंड वाहणारी नदी, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान या त्रीमिती मुळे एक ना अनेक माणसं आणि त्यांचे कळप एका ठिकाणी स्थिरावतात आणि मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात दडलेल्या आपल्या डिझाईनच्या गोष्टीला एक वेगळी कलाटणी मिळते. एका भटक्याचे परिवर्तन होऊन झालेला हा शेतकरी माणूस आता हवामानावर आणि पाण्यावर आधारित शेती करू लागला. वर्षातला जास्तीत जास्त वेळ मशागत करत घालवणे आणि उरलेला थोडासा वेळ कापणी करणे हा जणू त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला. आज जरी मुबलक अन्नाची शाश्वती असली तरी पुढच्या आठवड्यात, महिन्यात किंवा वर्षात उद्भवू शकणारी अन्नाची भ्रांत त्याला सतावू लागली. शेती करताना सतत येणाऱ्या या ताणतणावात आज अस्तित्वात असलेल्या महाकाय सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेची पाळंमुळं जन्माला आली.
शेतीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ह्या कळपामध्ये देवाण-घेवाण चालू झाली. यातून त्यांच्या वस्त्या बनल्या, अनेक वस्त्या एकत्र येऊन गावं वसली ; पुढे या गावांची शहरे झाली आणि याची परिणीती झाली ती मानवी संस्कृतीत. अनुक्रमे नाईल नदी, तिग्रीस-युफ्रेटिस नदी आणि सिंधू नदी यांच्या तीरांवर असलेल्या ईजिप्त संस्कृती, मेसोपोटेमियन संस्कृती आणि सिंधू संस्कृती म्हणून आपण यांना ओळखतो. अन्नधान्याचा मुबलक साठा, आर्थिक सुबत्ता आणि स्थिरावलेली शेती यातून जन्माला आले राजकारण, युद्ध, कला आणि तत्त्वज्ञान. पृथ्वीच्या केवळ दोन टक्के भूभागावर स्थिरावलेल्या या संस्कृतींमध्ये शेतकऱ्या बरोबर या संस्कृतींमध्ये राजे, सरकारी अधिकारी, सैनिक, धर्मोपदेशक, कलाकार आणि तत्त्ववेत्ते राहू लागले . एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की या वेगवेगळ्या माणसाच्या रूपांनी आपण एक समाजव्यवस्था जन्माला घातली. ही समाजव्यवस्था टिकवण्यासाठी मग कायदे, नियम, प्रथा, शिष्टाचार, परंपरा अशा एक ना अनेक गोष्टी माणूस प्रयत्नपूर्वक अंगीकारू लागला. मानवनिर्मित या समाज व्यवस्थांमध्ये अफाट माहितीचे स्त्रोत निर्माण होऊन वाहू लागले. जसे की मानवनिर्मित कायदे, करप्रणालीचे हिशेब, सैन्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य आणि दारूगोळा यांच्या नोंदी, साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांच्या दिनदर्शिका आणि बरच काही. गेल्या लाखो वर्षांपासून स्मरणशक्तीच्या जोरावर माहितीची साठवण करणाऱ्या माणसाला त्याच्या मेंदूच्या परिमित क्षमतेची जाणीव झाली आणि इथे जन्म झाला तो ‘लेखनाचा’.
आजची आपली डिझाईनची गोष्ट घडती आहे मेसोपोटेमियन संस्कृतीतील ‘ऊरुक’ नावाच्या शहरात. याचे भौगोलिक वास्तव्य सांगायचे झाले तर आजच्या अफगाणिस्तानातील बगदाद आणि बसरा शहरांच्या दरम्यान त्याकाळी ऊरुक शहर वसलेले होते. इसवी सन पूर्व ३५०० ते ३००० मध्ये ऊरुक शहरात प्रचंड सुबत्ता नांदत होती. शहराच्या वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबर त्यांचा दैनंदिन व्यवहार आणि समाजव्यवस्थेत माहितीचे नवीन स्त्रोत निर्माण होत होते. आजमितीस अपरिचित असणाऱ्या एका सुमेरियन बुद्धिवंतांने या माहितीचा संचय आणि प्रक्रिया करण्यासाठी एका प्रणालीचा शोध लावला. माणसाच्या स्मरणशक्तीच्या क्षमतेवर अवलंबून नसलेल्या या प्रणालीने जन्म दिला लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाळवलेल्या चिकणमातीतील पाटीला.
सांकेतिक खुणांवर अवलंबून असलेल्या या लेखन पद्धतीला साहित्यलेखन नक्कीच म्हणता येणार नाही. माहिती मांडण्याची ही सांकेतिक भाषा प्रामुख्याने दोन खुणांचा वापर करते. पहिला म्हणजे १, १०, ६०, ६००, ३६०० हे दर्शवणार्या खुणा. ( सुमेरियन लोक मूळ ६ किंवा मूळ १० च्या पटीत माहिती मांडत असत. मूळ ६ मानून बनवलेल्या त्यांच्या या पद्धतीतून पुढे ६० मिनिटे, २४ तास किंवा ३६० अंश अशा मापन पद्धती अस्तित्वात आल्या.) दुसऱ्या सांकेतिक खुणेत माणसं, जनावरं, व्यापारी, भौगोलिक सीमा, तारखा अशा स्वरूपाची माहिती मांडली जात असे. या दोन्ही प्रकारच्या सांकेतिक खुणा चिकणमातीने बनवलेल्या पाटीवर कोरून माहितीचे संकलन केले जात होते. विटा, घरं, भांडी आणि शहराच्या बांधकामात एक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणारी ही चिकणमाती आपल्या पाटीसाठी एक उत्तम साधनसामुग्री ठरते कारण ही माती भट्टीत भाजली की पुढे अनेक वर्षे तिला काहीही होत नाही; तसेच आकार घडवायला सोपी आणि गुळगुळीत पृष्ठभाग देणारी ही पाटी लिखाणासाठी उत्तम पर्याय म्हणता येईल. पाटी इतक्या काळ टिकली म्हणूनच आज आपण इतिहासात डोकावून तिचा आणि त्या अनुषंगाने त्या काळातील संस्कृतीचा अभ्यास करू शकतो. ऊरुक येथील उत्खननात शेकडोंनी सापडलेल्या या पाट्यांवर त्याकाळातील शहराला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या माहितीचे संकलन केलेले आढळून येते. जसे की, दैनंदिन कार्यालयीन व्यवहार, मोठ्या धार्मिक संस्था चालवण्यासाठी लागणारे जिन्नस आणि खर्च, सैन्यासाठी येणारा खर्च इत्यादी. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात सापडलेला पहिल्या लेखनाचा मजकूर हा गोष्ट, कविता, तत्वज्ञान किंवा कायदा सांगणारा नसून हिशेब किंवा कर प्रणाली सांगणारा आहे. लेखनाला मेसोपोटेमिया, ईजिप्त, चायना आणि मध्य अमेरिका येथून सुरुवात झाली पण सगळ्यात पहिले लिखाण कुठे घडले याचे खात्रीलायक उत्तर देणे अवघड आहे. पण आज मितिला काळाच्या ओघात टिकलेल्या आपल्या चिकणमातीच्या पाटीने दिलेले याचे उत्तर ‘मेसोपोटेमिया’ आहे असे म्हणता येईल.
Article originally published HERE.