Design Nonstop

औद्योगिकीकरण – भाग १ : Industrial Revolution – Part 1, by Design Nonstop

औद्योगिकीकरण - भाग १ : Industrial Revolution - Part 1, by Design Nonstop
Design Nonstop

कारखान्याच्या चिमण्यांमधून येणारा धूर, यंत्रांचा आवाज, कारखान्यांमधून बाहेर पडणारे दूषित पाणी, औद्योगिक वसाहतींच्या बाजूला तयार झालेल्या झोपडपट्ट्या; तर दुसरीकडे काम मिळण्याच्या अनेक संधी, सर्व प्रकारच्या वस्तूंनी भरून वाहणार्‍या बाजारपेठा आणि आधुनिक जीवनशैलीला पूरक उद्योग धंदे, अशा विरोधाभासी दोन रंगात रंगवलेलं औद्योगिकीकरणाचं हे चित्र आज जगातील कुठल्याही शहरात पाहायला मिळतं. फरक दिसतो तो फक्त उद्योगधंद्यांच्या प्रकारात आणि संख्येत. प्रगतीचा मूलमंत्र म्हणजे औद्योगिकीकरण, असा एक समज गेल्या शतकात संपूर्ण जगात उदयाला आला आणि माणसाच्या जगण्याला एक अद्भुत वळण मिळालं. आजची आपली डिझाईनची गोष्ट प्रगतीच्या या मुलमंत्राचा शोध घेत आपल्या भोवतालच्या भौतिक संस्कृतीचे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग बघुयात डिझाईन आणि औद्योगिकीकरण यांचं नक्की नातं तरी काय आहे.

औद्योगिकीकरण - भाग १ : Industrial Revolution - Part 1, by Design Nonstop 1
औद्योगिकीकरण https://sites.google.com/site/industrializationinmodernworld/

डिझाईनची आजची गोष्ट सुरू होते अठराव्या शतकात इंग्लंडमधून. त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती या गोष्टी मागचं मुख्य कारण म्हणता येईल. शेती करत स्थिरावलेल्या डिझाईनच्या गोष्टीतील माणसाच्या गरजा आता वाढायला लागल्या आहेत आणि म्हणूनच सतराव्या शतकात या माणसाने शेतीसाठी कृत्रिम खतांचा वापर चालू केला. यामुळे कृषी क्रांती घडून आली आणि सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन केले गेले. प्राथमिक गरजेची निकड इतक्या मोठ्या प्रमाणात भागली गेल्यामुळे तेथील नागरिक स्थिरावले आणि सर्जनशील उद्यमाकडे कल वाढू लागला. अठराव्या शतकात इंग्लंडची लोकसंख्या दुपटीने वाढली आणि लोकांचा शहराकडे ओघ सुरू झाला. वाढणाऱ्या या लोकसंख्येबरोबर भौतिक गरजांचं प्रमाण वाढलं आणि त्या पूर्ण करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने हस्तकौशल्य वापरून वस्तू बनवणारे उद्योग कमी पडू लागले. कमी किमतीत, कमी वेळेत आणि मोठ्या प्रमाणात वस्तू बनवणे ही काळाची गरज बनली‌. त्याचबरोबर उपलब्ध असणारे नवीन शक्ति स्त्रोत, नवीन साधन सामग्री, यंत्र सामग्री आणि मानव संपत्ती या सगळ्याचा एकत्रित परिपाक बनून औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

औद्योगिकीकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे यंत्र म्हणजे माणसाने डिझाईन केलेले ‘वाफेवर चालणारे  इंजिन’. १७१०साली लोखंडी सामानाची खरेदी विक्री करणाऱ्या थॉमस न्यूकॉमन नावाच्या एका  ब्रिटिश माणसाने  कोळशाच्या खाणीत साठणारे पाणी काढण्यासाठी कमी क्षमतेच्या पाण्याच्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती केली. १७६३ ते १७७४ या काळात प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेम्स वॉटने जास्त क्षमतेचे वाफेवर चालणारे इंजिन बनवण्याचे अनेक असफल प्रयत्न केले. अखेरीस १७७६ चाली मॅथ्यू बोल्टन नावाच्या उद्योजकाच्या मदतीने जेम्स वॉटने केलेले प्रयत्न फळाला आले आणि अतिशय शक्तिशाली आणि उत्तम कार्यक्षमता असणारे वाफेचे इंजिन बनवले गेले. या इंजिनाने मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाला एक अद्भुत वळण दिले आणि डिझाइनची गोष्ट एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली. ही गोष्ट पुढे नेण्यापूर्वी याआधी घडलेल्या दोन महत्त्वाच्या वस्तूंचा उल्लेख इथे प्रकर्षाने केला पाहिजे. एक म्हणजे घड्याळ आणि दुसरे प्रिंटिंग मशीन. औद्योगिकीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी ही दोन यंत्रे मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात बऱ्याच आधी आलेली आढळतात. वेळ मांडण्याचे शास्त्र आणि पद्धती जरी माणसाला अनेक शतकांपासून अवगत असली तरी यांत्रिक पद्धतीने वेळेची मांडणी करणारे घड्याळ साधारण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बनवले गेले.तर १४४०साली जोहानस गटेनबर्ग नामक जर्मन भिक्षूने बायबल ग्रंथाच्या प्रती छापण्यासाठी लाकडात कोरलेल्या अक्षरांची जुळणी करून कागद आणि शाईच्या वापराने यांत्रिक छपाईचे तंत्रज्ञान विकसित केले. या दोन निव्वळ वस्तू किंवा शोध नसून मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातले दोन महत्त्वाचे टप्पे आहेत ज्यामुळे माणसाची वाटचाल यांत्रिकतेच्या दिशेने सुरू झाली.

औद्योगिकीकरण - भाग १ : Industrial Revolution - Part 1, by Design Nonstop 3
जेम्स वॉट_ वाफेवर चालणारे इंजिन https://www.pictokon.net/bilder/2008-12-bilder-fotos/dampfmaschinen-06-james-watt-doppeltwirkende-dampfmaschine-mit-drehbewegung-ab-1784-als-antrieb-von-textilmaschinen.jpg

औद्योगिकीकरण घडून येण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत होत्या असे म्हणता येईल १. माणसाची जागा यंत्रांनी घेतली. २ इंधन शक्ती इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होती की माणसांचा उपयोग कारखान्यांमध्ये केवळ मजूर म्हणून करणे शक्य झाले आणि ३. शक्तीची उपलब्धता वाफेच्या इंजिनामुळे प्राणी आणि पाण्यावर अवलंबून न राहता गरजेच्या ठिकाणी सहज पोहोचवता येऊ शकली. या घटनेमुळे लंडन, शिकागो, न्यूयॉर्क, बोस्टन यांच्यासारख्या शहरांचा कायापालट झाला आणि पुढे जागतिकीकरणाचे पर्व सुरु झाले. अठराव्या शतकाच्या शेवटी वाफेवर चालणाऱ्या इंजिनामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या आणि त्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जाऊ लागला. जसा की कापूस कताईसाठी बनवलेल्या मागावर या इंजिनाचा उपयोग करून माग अधिक कार्यक्षम बनवला गेला, आणि हातमाग चालवणारा कुशल कारागीर शेवटी आधुनिक यंत्रमागाचा मजूर बनुन राहिला. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे रेल्वे इंजिन; ज्यामुळे अंतराची परिभाषा बदलली आणि जग खऱ्या अर्थाने जवळ येऊ लागले. औद्योगिकीकरणाचा आणखी एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे त्याने जगाला दिलेले दोन मौलिक साहित्य ‘लोखंड’ आणि ‘स्टील’. स्टीलचा उपयोग अनेकविध प्रकारांनी पुढच्या शतकात सतत चालूच होता; पण परिचित असलेलं लोखंड अब्राहम डार्बीने जसे वापरले त्याने या साहित्य बद्दलच्या परिसीमा बदल्या. उच्च तापमानाला वितळलेले लोखंड मेणाच्या साच्यांमध्ये घडवून अतिशय उत्तम प्रकारची स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी त्याने बनवली. ओतीव लोखंडा पासून बनवलेल्या या पद्धतीला ‘कास्टआयर्न’असेनावदिलेगेलेआणि इतकेच नाही तर कोलब्रुकडेल येथे राहणाऱ्या अब्राहम डार्बीने लोखंडापासून वस्तू बनवण्याच्या पद्धतीचे हक्क म्हणजेच ‘पेटंट’ स्वतःच्या नावावर करुन घेतले.

औद्योगिकीकरणाच्या याकाळात इंग्लंडच्या वसाहती एका बाजूला वाढत होत्या तर दुसरीकडे इंग्लंडची सगळ्यात मोठी परदेशी वसाहत राणीच्या जाचातून मुक्त होऊ पहात होती आणि आठशेच्या शतकात एका नव्या राष्ट्राचा उदय झाला; तो देश म्हणजे आजची जागतिक महासत्ता ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका’. औद्योगिकीकरणाचं हे वारं अमेरिकेत लवकर पोहोचलं आणि म्हणता म्हणता अख्खा देश ह्या वाऱ्यात वाहू लागला. सत्तेचे विकेंद्रीकरण सुरू झालं आणि औद्योगिकीकरणाच्या उपयोग सीमा सुरक्षेसाठी बनवण्यात येणाऱ्या बंदुका आणि काडतुसांच्या उत्पादनात केला जाऊ लागला. एली व्हीटनी नामक एका अमेरिकी शोधक आणि उद्योजकाने कनेक्टिकट येथील त्याच्या कारखान्यात दोन वर्षात दहा ते पंधरा हजार बंदुका बनवून एक मापदंड तयार केला. त्याने लढवलेल्या शकलेत बंदुकीचे विविध भाग राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी बिनचूक रित्या बनवून न्यू हेवन, कनेक्टिकट येथील त्याच्या कारखान्यात एकत्र म्हणजेच असेंबल केले गेले. या काम करण्याच्या पद्धतीने कामाचे विकेंद्रीकरण होऊन मोठ्या प्रमाणात वेळेची बचत साधली गेली ज्यामुळे उत्पादन अनेक पटींनी वाढले. त्याच्या या पद्धतीला आजही ‘निर्मितीची अमेरिकी पद्धत’ म्हणून संबोधले जाते. डिझाईनच्या जगावर निर्मितीच्या या निष्णात पद्धतीचा प्रभाव आजही आपण अनुभवतो.क्रमशः…..

_हृषीकेश खेडकर

Share your comments

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Recent

Terrace-view-of-Mumbai-Mohammed

Architecture is too Important to be Left to Architects Alone

Jaimini Mehta critiques architectural education in India, arguing for reform that balances vocational training with liberal education, combining science, humanities, and arts. He challenges the Western-centric approach that has marginalized indigenous architectural knowledge and practices.

Read More »

WE ARE HIRING /

ArchitectureLive! is hiring for various roles, starting from senior editors, content writers, research associates, graphic designer and more..